नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील कल्याण व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार खासदार अनुक्रमे श्रीकांत एकनाथ शिंदे व अमोल रामसिंग कोल्हे यांना यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, संसदेतील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल एन. के. प्रेमचंद्रन, अधिर रंजन चौधरी, विद्युत बरन महतो आणि महाराष्ट्रातील हीना विजयकुमार गावित आदी खासदार ‘संसद महारत्न’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी राजधानी नवी दिल्लीत आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
गेल्या वर्षभरात संसदेत उत्कृष्ट कामगिरी बजावणे, प्रश्नोत्तराचा तास व नियमित कामकाजात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल देण्यात येणाऱ्या ‘संसदरत्न’ पुरस्काराचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे मानकरी ठरले आहेत. याबाबत आयोजकांनी अधिकृत घोषणा केली. यासोबतच पश्चिम बंगालमधील बलूरघाट मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुकांत मजुमदार, मध्य प्रदेशातील मंदसौर मतदारसंघाचे खा. सुधीर गुप्ता आणि काँग्रेसचे पोर्ट ब्लेयरचे खा. कुलदीप राय शर्मा यांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी नामांकित खासदारांच्या नावावर कायदे व संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल तथा माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने मोहोर उमटवली. याबाबत संसदरत्न पुरस्कार देणाऱ्या ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ चे संस्थापक-अध्यक्ष के. श्रीनिवासन यांनी माध्यमांना सांगितले. महाराष्ट्रातील चर्चित व तरुण तडफदार खासदार अमोल कोल्हे व श्रीकांत शिंदे यांच्या संसदेतील कामगिरीबाबतचे आकडे लोकसभा व राज्यसभेच्या संकेतस्थळावरून व पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च संस्थेकडून घेण्यात आले. सभागृहात चर्चा सुरू करणे, बिगर शासकीय विधेयक मांडणे, याबाबत जाणून घेण्यात आले.
त्याचा तपशीलवार अभ्यास करून दोन्ही खासदारांना ‘संसदरत्न’ ने गौरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ), अधिर रंजन चौधरी (काँग्रेस, पश्चिम बंगाल), विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड) आणि हीना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) आदी खासदारांना १७ व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.