मुंबई दि. १५ फेब्रुवारी – यंत्रणेचा वापर करून सरकार पाडणे… आमदार फोडणे… आमदार खरेदी करणे… हे सर्व आता उघड झाले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारची पोलखोल केली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
मागील सरकारकडून आयटी विभागामध्ये झालेले घोटाळे आणि भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावर नवाब मलिक यांनी आपली भूमिका माध्यमांपुढे मांडली.हे सर्व विषय संजय राऊतसाहेब ईओड्ब्ल्यूकडे (Economic Offences Wing) पाठवतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी हरियाणा कनेक्शन काढले आहे. आयटी विभागात सर्वात जास्त घोटाळा झाल्याचे आम्ही याआधीपासून सांगत होतो. यापुढे यासंदर्भात अधिकाधिक कागदपत्रे लोकांपुढे येतील, असेही नवाब मलिक म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये काही लोकांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते टिएमसीमध्ये आले. त्यांनी सर्व परिस्थिती काय आहे ती मांडली होती. महाराष्ट्र राज्यातही यंत्रणेचा दुरुपयोग होतो हे स्पष्ट आहे. पण जास्त दिवस यंत्रणेचा गैरवापर चालणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
संजय राऊत यांनी नावे घेऊन जबाबदारीने आरोप केले आहेत. आरोपांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. यात न थांबता एकजुटीने कसे पुढे जाता येईल यावर चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.