सोलापूर वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप–प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपलं असल्यामुळेच हे लोक एकत्र आले आहेत, असा जोरदार टोला शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांच्या मागे कुणीही नाही, ते एकटेच इंजिन घेऊन पळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अदानी यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीत काहीच जमले नाही, म्हणून आता काही जमते का हे पाहण्यासाठी राज ठाकरेंकडून टीका सुरू आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हटलं की, राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं होऊ नये ही त्यांची पहिली चूक होती. आणि आता पुन्हा एकत्र येणं ही त्यांची दुसरी चूक आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. “अजित पवारांचे हात आधीच बरबटले आहेत. माझ्या मतदारसंघातील साडेतीन कोटींच्या बोगद्यांची साडेअठरा कोटींची बिले काढण्यात आली. अजित पवार म्हणतात तसं इस्टिमेट कधीच वाढत नसतं,” असा थेट निशाणा त्यांनी साधला.
दरम्यान, सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असून, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका होत आली आहे. मात्र पालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनीच पलटवार करत भाजपवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. सिंचन प्रकल्पांच्या खर्चवाढीमागे 1999 पूर्वी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी जुन्या फाईलींचा संदर्भ देत सांगितले की, 1999 मध्ये काँग्रेस–राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्या काळात पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलावर आली होती. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 310 कोटी रुपये पाहून आपल्यालाच धक्का बसल्याचं त्यांनी नमूद केलं. एकीकडे ठाकरे बंधूंवर बोचरी टीका, तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्यावर आरोप–प्रत्यारोप सुरू झाल्याने पालिका निवडणुकीचा प्रचार अधिकच तापल्याचं चित्र आहे.