राष्ट्रपती पदक विजेते स.पो.नि.सुनिता पवार यांचा महेश इंगळेंच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र देऊन सन्मान.
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील मराठा मंदीर संचलित श्री.शहाजी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक कै.बाजीराव साळुंखे यांची कन्या व सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिता पवार यांना राष्ट्रपती पदक लाभल्या प्रित्यर्थ महेश इंगळे यांच्या हस्ते स्वामी कृपा वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांनी सुनीता पवार यांचा स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन हा सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश इंगळे यांनी आमचे गुरुवर्य कै.बाजीराव साळुंखे सर यांच्या कन्या सुनिता पवार (साळुंखे) यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळविणाऱ्या श्री क्षेत्र अक्कलकोटच्या पहिल्या महिला म्हणून मान मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून स्वागत, अभिनंदन व कौतुक होत आहे. सुनिता पवार (साळुंखे) ह्या सोलापूर शहर पोलीस दलात सन १९९२ साली भरती झाल्या. त्यांच्या ३३ वर्षाच्या सेवेत पोलीस शिपाई, नाईक, हवलदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत झेप घेतली आहे. नोकरी बरोबरच त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या पुरस्काराप्रित्यर्थ एक उत्कृष्ट देश सेवक, आणि गृहिणी म्हणून त्यांचा जिल्ह्यात नावलौकिक झालेला आहे. त्यांच्या या कर्तृत्वास स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा म्हणून आज येथे श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला असल्याचे मनोगत व्यक्त केले.
श्री.वटवृक्ष मंदिरातील या सन्माना प्रित्यर्थ बोलताना सुनिता पवार (साळुंखे) यांनी आपण पोलीस सेवेत गेल्या ३३ वर्षापासून कार्यरत आहे. मिळालेले राष्ट्रपती पदक आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ व स्वामी समर्थांचे आणि महेश इंगळे यांच्या आशीर्वादाचे बळ आहे. यामुळे तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने हा पुरस्कार आपणास प्राप्त झाला असल्याचे सांगून समर्थांचे आणि महेश इंगळे यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन धन्य झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, डॉ.गिरीश साळुंखे, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.आदित्य कोतवाल, श्रीशैल गवंडी, संजय पवार, डॉ.हिरण्णा पाटील, गिरीश पवार, प्रसाद सोनार आदींसह मंदीर समितीचे सेवेकरी उपस्थित होते.