अंतरवाली सराटी वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. दोघामंध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे देखील उपस्थित होते. ही भेट अंतरवाली सराटी यांच्या सरपंचाच्या घरी झाली. सर्व पक्षांच्या याद्या, उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू, आणि त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचणी देखील सुरु केली आहे असे जरांगे म्हणाले .
उदय सामंत या भेटीनंतर म्हणाले की, मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो. मी सगळयांना विचारलं त्यांना वेळ आहे का, ते सर्व कामामध्ये दिवसभर व्यस्त असतात. आणि काल मला समजलं आज ते कामामधून थोडे मोकळे झाले आहेत,मी एक मित्र म्हणून त्यांना भेटावं त्यांच्याशी भेटून बोलावं या उद्देशाने आलो होतो. जर रात्री भेटलं तरी बातमी होतो, उन्हामध्ये भेटलो तर ब्रेकिंग होते. त्यामुळे करायचं काय हा देखील प्रश्न आमच्यासमोर आहे. आजची जी चर्चा झाली ती राजकीय चर्चा नव्हती, मी आलो,त्यांना भेटलो आणि चर्चा झाली चहा घेतला आणि निघालो, या भेटीमध्ये आमच्यात राजकीय चर्चा झालेली नाही.
तसेच लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एका त्यातला प्रकार आहे. कारण मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, जर त्याच्यावर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, आणि या गोष्टींमध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या बाबत एक मित्र म्हणून चर्चा होऊ शकते, किंवा भेट होऊ शकते. आमच्या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी सर्वाना विनंती आहे, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की,भेटीवेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. दरम्यान फडणवीस यांनी आरक्षण न दिल्यामुळे 30 तारखेला निर्णय येईल, आम्ही आमच्या निर्याणावर ठाम आहे. आम्ही जे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण झालं नाही, आम्हाला आरक्षणाची अशा लागली होती. ती फडणवीसांनी पुर्ण होऊ दिली नाही. आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. ते आरक्षण फडणवीसांननी मिळू दिल नाही, असं म्हणून आणखी एकदा मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला आहे.