मुंबई : वृत्तसंस्था
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढविला होता. आता यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उत्तर दिले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यापूर्वी स्वतःला आरशात पाहा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला. उद्धव ठाकरे यांनी स्वतःला आरशात पहावे. त्यांनी स्वतःला आरशात पाहिले तर ते अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना वरील टोला हाणला आहे. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःला आरशात बघितले, तर ते अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत. मी यापूर्वीही सांगितले की, ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात 20 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. पण त्यांनी फुटकी कवडी शेतकऱ्यांना दिली नाही.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पूर्वी आम्ही सत्तेत होतो. तेव्हाही आम्ही शेतकऱ्यांना 20 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही फार मोठे काम केले असे नाही. उलट त्यांनी घोषणा केली होती, चालू खात्यावर आम्ही 50 हजार रुपये देऊ. पण प्रत्यक्षात त्यांनी काहीही दिले नाही. उलट 16 लाख शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार आल्यावर अनुदान देण्यात आले.
सरकारने शेतकऱ्यांना सुमारे 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिलेले आहे. ठाकरेंनी त्यांच्या काळात केलेल्या कर्जमाफीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिले जात आहेत. त्या व्यतिरिक्त 6 हजार रुपये राज्याचे आणि 6 रुपये केंद्राचे देण्यात येत आहेत. विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. कुठे तरी पक्षाला जिवंत ठेवायचे आहे, म्हणून ते हंबरडे फोडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या जिल्ह्यात कुणी ओळखत नाही, त्यांच्या आरोपांवर मी काय उत्तर द्यायचे, असेही फडणवीस यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.