ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरे दोन दिवसात घेणार ६ सभा

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील आगामी लोकसभेच्या पूर्वी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय बुलडाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर ते लगचेच 24 फेब्रुवारी रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते. मात्र, त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ठाकरे गट कामाला लागले आहे. अशात स्वतः उद्धव ठाकरे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाकरेंच्या दौऱ्याची चिखलीतून आज दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. तर पुढील दोन दिवस ते बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, जळगाव जामोद, खामगाव आणि मेहकर येथे जनसंवाद साधणार आहेत. आज आणि उद्या या दोन दिवसांत ठाकरेंच्या एकूण सहा सभा होणार आहेत. त्यामुळे या सभांमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

उद्धव ठाकरे आज दुपारी दोन वाजता चिखली येथे पोहोचतील. त्यानंतर ते मोताळा येथील कार्यक्रमाला साडेचार वाजता उपस्थित राहतील. सायंकाळी साडे सहा वाजता जळगाव जामोद येथे देखील शिवसैनिकांसोबत संवाद साधतील. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते खामगाव, मेहकर, सेनगाव आणि कळमनुरीत शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाड्यात होणार्‍या जनसंवाद मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदींची उपस्थिती असणार आहे.

बुलडाणा दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे 24 फेब्रुवारीला हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा देखील दौरा करणार होते. याबाबत तयारी देखील झाली होती. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला असल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!