हुकूमशाही व देशाचे संविधान बदलणाऱ्या विरोधात एक व्हा
आमदार शिंदे यांच्या हस्ते स्वामी समर्थ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लोकसभेची लढाई ही कोणा एका उमेदवाराविरुद्ध नाही.ती हुकूमशाही विरुद्ध आणि देशाचे संविधान घटना बदलणाऱ्याच्या विरोधातली आहे. ही प्रवृत्ती आपल्याला ठेचून काढायची आहे. या लढाईसाठी आता मतदारांनी सज्ज राहावे,असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.बुधवारी, श्री रामनवमी निमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात व श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होत्या.भाजप हा जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणारा पक्ष आहे.त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत शेतकरी, कामगार, पदवीधर युवक, महिला वर्ग कोणीही समाधानी नाही. महागाई गगनाला भिडली आहे.दरवेळी धार्मिक मुद्द्यावर निवडणूक नेऊन लोकांना त्या बाबींमध्ये गुंतवून प्रभाव टाकून मतदान मिळविणे ही भाजपची जुनीच पद्धत आहे ती यावेळी हाणून पाडा,असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.माझ्या वीस वर्षांच्या कालावधीत नळ पाणी पुरवठा योजना, पाझर तलाव, साठवण तलाव, एकरुख उपसा जलसिंचन योजना ही कामे केली. खरे पाहता त्याच वेळी अक्कलकोट तिर्थक्षेत्र हे विकासाचे मॉडेल झाले. कोणताही विकास चार वर्षांत होऊच शकत नाही. परंतु भाजप खोटे बोलून गैरसमज करीत आहे.आमदार प्रणिती शिंदे या सोलापुरची लेक असुन त्यांना विजयी करुन भाजपचे बीडचे पार्सल बीडला परत पाठवा, असे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. यानंतर काँग्रेस कार्यालयात ही नेते मंडळींचे मार्गदर्शन झाले आणि उद्याची उमेदवारी दाखल करण्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख नेते मंडळींनी केले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील, अरुण जाधव, सुलेमान तांबोळी, नगरसेवक विनोद भोसले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रईस टिनवाला, महिला अध्यक्षा शितल म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख प्रिया बसवंती, कॉंग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा शाहिन शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम जाधव, बंदेनवाज कोरबु, बाबा पाटील, शशिकांत कळसगोंडा, अल्लीबाशा अत्तार, मुबारक कोरबु, काशिनाथ कुंभार, शाकिर पटेल, सद्दाम शेरीकर, रामचंद्र समाणे, शरणु अळळोळी, किरण जाधव, बसवराज अळळोळी, व्यंकट मोरे, संजय डोंगराजे, महादेव चुंगीकर, विकी कोरे, सुरेखा पाटील, मैन्नौद्दिन कोरबु, चंदन आडवीतोटे,शिवा इचगे, इसापुरे आदी उपस्थित होते.