अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहर आणि तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली.यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. साधारण अर्धा ते एक तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता. त्याशिवाय लाईट देखील गायब झाल्याने काही काळ अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
कडक उन्हात पडलेल्या या पावसामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उन्हाळ्यात पावसाळी वातावरणासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांनी हा पाऊस पडल्याचे वृत्त आहे.अक्कलकोट शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास या पावसाने जोरदार झोडपून काढले.संध्याकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.मागच्या दोन दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात तालुक्यात पाऊस पडत आहे.हवामान खात्याने १८ एप्रिल पर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.यात फळभाज्यांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतच आहे पण आंब्याच्या कैरींचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.यावर्षी आंब्याला मोहरच कमी आला होता.
त्यात या अवकाळी पावसाने कहर केल्याने आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवार प्रमाणे आज देखील दिवसभरात उकाडा अधिक होता. सकाळपासूनच पावसाचा अंदाज सुरू होता. अशाच संध्याकाळी सुरुवातीला रिमझिम आणि त्यानंतर जोरदार अशा पद्धतीने पाऊस झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.