ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाळी पावसाने वाढविले शेतकऱ्यांचे टेन्शन : पिकांना मोठा फटका

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील काही भागात फ्रेबुवारी महिन्याच्या शेवटी देखील अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे. राज्यात काल दिवसभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, लिंबू, संत्री, कांदा, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांना याचा मोठा फटका बसलाय.

विदर्भासह मराठवाड्यातीन अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. काल अकोला जिल्ह्यातील बाळापुर, तेल्हारा, अकोट आणि अकोला तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. तर काही भागात गारपिट आणि वादळी वाराही सूटला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा आणि बाळापुर तालुक्यात फळबाग तसेच कांदा, लिंबू, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हरभरा सोंगणी केल्यानंतर शेतात लावलेल्या हरभऱ्याच्या गंजी कालच्या पावसानं भिजल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार झालेल्या पावसाने पुन्हा शेतकरऱ्यांसमोर आस्मानी संकट ठाकले आहे. गहु, ज्वारी पिकाचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
बाळापुर तालुक्यातल्या लिंबू उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झालंय. आता नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी येथील शेतकरी करतायेत.

बुलढाणा जिल्ह्यात देखील काल रात्रभर वादळी पाऊस झाला. त्यात काही ठिकाणी प्रचंड गारपीट झाली. या अवकाळी पावसाने शेतातील गहू, हरबरा आणि संत्री बाग, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्माळून पडली आहेत. सर्वात जास्त नुकसान संग्रामपूर, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, लोणार नांदुरा या तालुक्यात झाल्याचे दिसून येत आहे. सध्या पाऊस जरी थांबला असला तरी ढगाळ वातावरण आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!