मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
तपासादरम्यान, एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. जेव्हा हत्याकांडाचा हा प्रकार घडला, तेव्हा आरोपी मॉरिस याच्यासोबत काही लोक ऑफिसमध्ये आले होते. गोळीबार होण्याआधी ते तेथून बाहेर पडले. यामध्ये आरोपी मॉरिस याचा मित्र मेहुल सुद्धा होता. गोळीबारानंतर तो तिथून बाहेर पडला आणि रिक्षाजवळ गेला. तिथून परत एकदा पान टपरीजवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेला, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
दरम्यान, मेहुलसोबत रिक्षामध्ये असलेले ते दोघे कोण होते? मेहुल याला गोळीबाराबाबत काही माहिती होती का? असे अनेक सवाल सीसीटीव्ही फुटेज पाहून उपस्थित होत आहेत. सध्या गुन्हे शाखेकडून या व्हिडीत असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.