ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“तर आमदारकीचा राजीनामा..”, उत्तमराव जानकरांनी ठेवली अट

मारकडवाडी, वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापूरमधील मारकडवाडी प्रचंड चर्चेत आली आहे. 1400 लोकांनी अॅफिडेव्हीट करुन देण्याची तयारी दाखवली असून, निवडणूक आयोग जर बॅलेटवर मतदान घेणार असेल, तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत असं उत्तमराव जानकर म्हणाले.

माझ्या आमदारकीपेक्षा लोकशाहीचा लढा जास्त महत्वाचा आहे असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. इथे आम्ही बॅलेटवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आला. सीआरपीएफ आणि पोलीस गावात आले, मतदान होऊ दिलं नाही, पण आम्ही आता सुप्रिम कोर्टात जायची गरज पडली तर, तिथेही जाऊ असं उत्तमराव जानकर म्हणाले. आम्ही तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ठराव द्यायला तयार आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी अशी मागणी उत्तमराव जानकर यांनी केली.

माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी या गावामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर बॅलेटवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ही निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे या गावात काही काळ संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यभर या गावाचं नाव पोहोचलं, विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आणि विधानसभा अधिवेशनात या मुद्दयाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेत या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. त्यानंतर आज शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज या गावात उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. तेव्हा गावकऱ्यांनीही या नेत्यांसमोर यंत्रणेबद्दलचा रोष व्यक्त केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून, या निकालात EVM चा गैरवापर झाल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केल्या जातो आहे. त्यातच सोलापूरमध्ये असणाऱ्या माळशिरस मतदारसंघात यंदा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या पक्षाकडून या मतदारसंघात उत्तमराव जानकर हे निवडणूक लढत होते, तर भाजपकडून राम सातपुते मैदानात होते. या मतदारसंघातून उत्तमराव जानकर विजयी झाले, मात्र अनेक गावांमध्ये त्यांना अपेक्षित असलेली आघाडी मिळाली नाही. ज्या गावांमधून आघाडी मिळाली नाही, त्यापैकी एक प्रमुख गाव म्हणजे मारकडवाडी. या गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!