सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे दीपक वैद्य यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून निवडून आलेले इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा केली. ही निवड सव्वा वर्षासाठी असणार आहे.
शहरातील बालाजी सरोवर येथे पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी वैद्य व पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघांनीही आपल्या पदांसाठी अर्ज दाखल केले असून, विरोधी पक्षाचे संख्याबळ लक्षात घेता त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ जागांपैकी भाजपने ३८ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा पहिला अध्यक्ष कोण होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने दीपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते.
दीपक वैद्य यांच्या निवडीमुळे बार्शी तालुक्याला तब्बल ६५ वर्षांनंतर प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. शेतकरी कुटुंबातील वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते प्रथमच जिल्हा परिषदेत निवडून आले असून, थेट अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपाध्यक्षपदासाठी मात्र चुरस होती. अध्यक्षपदासाठी धनगर समाजाला प्राधान्य दिल्यानंतर सामाजिक समतोल राखण्यासाठी मराठा समाजातील इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांनी यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.
इंद्रजीत पवार हेही प्रथमच जिल्हा परिषदेत निवडून आले असून, यापूर्वी त्यांनी उत्तर सोलापूर पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे. पवार कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असून, पक्षासाठी केलेल्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत त्यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.
या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवा आयाम मिळाला असून, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या कारभारावर भाजपची ठाम छाप राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.