पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरात नुकतेच एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली असतांना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार घटनेप्रकरणी वसंत मोरे यांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ देखील वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली.
वसंत मोरे यांनी यावेळी संपूर्ण स्वारगेट आगार परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो याचा अर्थ काय? असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या बलात्काराला सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत. या ठिकाणी रोज कोणाला तरी आणले जाते आणि इथे हे सगळे धंदे चालतात. तसेच त्यांनी यावेळी काही बस देखील दाखवल्या जिथे अनेक निरोधचे पाकीट पडलेली होती. याचा अर्थ या ठिकाणी सर्रासपणे बसमध्ये लॉजिंगची सुविधा करण्यात आली आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
वसंत मोरे म्हणाले, या ठिकाणी 20-20 सुरक्षा रक्षक असून झोपा काढतात. या ठिकाणी महिलांच्या साड्या, कंडोमचे पाकीट, दारूच्या बाटल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की सुरक्षा रक्षकांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडतात. सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात? असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला आहे. या घटनेची माहिती आगारप्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
इथे रोज बलात्कार होत आहे, शेकडो कंडोमची पाकिटे पडलेली आहेत इथे. इथे वीस लोक नेमलेली आहेत, ही वीस लोक काय करतात? असा सवाल वसंत मोरे यांनी केला आहे. शिवशाही नाव असलेल्या बसमध्ये असले प्रकार करताना लाज वाटत नाही का यांना? आम्हाला जेव्हा याची माहिती मिळाली की एवढ्या मध्येपर्यंत हे प्रकार सुरू असतात. इथे येताना सुरक्षा रक्षकांची केबिन ओलांडून यावे लागते. याचा अर्थ यात एसटीचे कर्मचारी सहभागी असतात, सुरक्षा रक्षक सहभागी आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.