छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नेहमीच उपोषण करीत राहिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.
मनोज जरांगे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही सर्वच जातीधर्मांचे उमेदवार देणार. फक्त समाजाने मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे. मी उमेदवार म्हणून दगड दिला तरी त्यांनी त्याला निवडून द्यावे. त्यानंतर मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो. देवेंद्र फडणवीस आमच्या आई-बहिणीला बोलले. हे आम्ही सहन करायचे? सध्या सरकारसोबत आमचा संपर्क शून्य आहे. जोपर्यंत सहन होते, तोपर्यंत सहन करू. नंतर सर्वकाही बाहेर काढू. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान कितीही पाऊस किंवा पूर येऊ द्या आमच्या माताभगिनी रस्त्यांवर दिसतील, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा गेंडा म्हणून केला. ते म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही. प्रसाद लाड बोलत आहेत, पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळ नाही. आपले गोरगरीब फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसायचे, पण ते उत्तर देत नाहीत. माझ्यावर टीका हा त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी बोललो नाही. त्यामुळे त्यांनी नीलेश व नीतेश या दोन्ही मुलांना समजून सांगावे. कारण, माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत. मी सरकारवर विश्वास ठेवला, पण हे बिलिंदर लोकांना मध्ये टाकत आहेत. मला ट्रॅप केले जात आहे. फडणवीस हेच खरी सत्ता चालवत असून, यामुळेच भाजपचे वाटोळे होत आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.