अन्न नागरी पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय, पिडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका :- अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
मुंबई,दि.१३: अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमातंर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडित महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
वेश्या व्यवसाय, बालवेश्या व वेश्यांचा मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सुचनेनुसार वेश्या, बालवेश्या व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन होण्यासाठी त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचाराधिन होते.त्यानुशंगाने शासनाने निर्णय घेऊन याबाबत शासननिर्णय देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असणा-या यादीतील स्वंयसेवी संस्थाकडून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपुर्वक विचार करून ओळखीचा पुरावा (Identification Proof) व वास्तव्याचा पुरावा (Residential Proof) सादर करण्यापासून त्यांना सूट देण्यात येत आहे. या कागदपत्रांची संबधितांकडून मागणी देखील करण्यात येवू नये असे या शासन निर्णयात देखील नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचेकडील यादीतील महिलांकडून नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरण करण्याची कार्यवाही संबंधित संस्था व महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार असून व शिधापत्रिका केवळ भारतीय नागरीकांना वितरीत होईल याची काटेकोरपणे दक्षता घेण्याबाबत संबधित कार्यान्वयीन यंत्रणानी दक्षता घ्यावी असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.