मुंबई : वृत्तसंस्था
सरकारी यंत्रणा आणि सरकारी पैशांचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरे करत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही अशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा आणि सरकारी पैशांचा वापर करत प्रचार करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजपवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आचारसंहिता केवळ विरोधी पक्षांसाठी आहे का? असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे मात्र दौरे सुरू असून यावर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. निवडणुकांची घोषणा झाल्यावर पंतप्रधान असो आणि कोणतेही मंत्री पदावर राहत नाहीत. ते सर्वसामान्य नागरिक आणि निवडणुकीतील उमेदवार असतात. मोदी यांचे मात्र सरकारी खर्चातून दौरे सुरू आहेत. भाजप अनेक सरकारी यंत्रणांचा हवा तसा वापर करत आहे. सरकारच्या खर्चातून निवडणुकीचा प्रचारच सुरू आहे. निवडणुकीतील त्यांचा खर्च पक्षाच्या खात्यात करणे अपेक्षित असते, असे राऊत म्हणाले.
मुंबईत भाजपने १० किंवा ५० जनसभा घेतल्या तरी मुंबईतून त्यांची हद्दपारी निश्चित असल्याची टीकाही राऊत यांनी केली. मेरठ येथील सभेत मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणारच, असे सांगितले; पण त्यांच्या सभेच्या वेळी त्यांच्या आजूबाजूला १० भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. दररोज सरासरी ५ भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपत प्रवेश दिला जातो, अशी टीकाही पुढे राऊत यांनी केली आहे