ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवशाही बसचा भीषण अपघात : दोन प्रवासी ठार तर २८ जखमी

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच नागपूरवरून अमरावतीकडे येणाऱ्या शिवशाही बसचा राष्ट्रीय महामार्ग सहावर नांदगाव पेठ जवळ आज (रविवार) सकाळी भीषण अपघात झाला. गाईला वाचविताना बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात दोन प्रवासी ठार झाले असून, 28 जण जखमी आहेत. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी शिवशाही बस क्रमांक एमएच 09 ईएम 1778 ही नागपूर वरून अकोला येथे जाण्यासाठी 35 प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान अमरावती मार्गावर नांदगाव पेठ रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक बसच्या समोर एक गाय आडवी आली. त्यामुळे बस चालकाने गाईला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी 28 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढण्यात आले. मात्र बसमध्ये काही प्रवासी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. या अपघातानंतर नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी नांदगाव पेठ पोलीस व शहर वाहतूक पोलीस दाखल झाल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!