ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

आठ कोल्हापुरी बंधारे कोरडे, 'कुरनूर' मृत साठ्याकडे

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी

उन्हाळा अद्याप दोन महिने बाकी असताना अक्कलकोट तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. कुरनूर धरणात तर केवळ मृतसाठा वगळता आठ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने नदीकाठच्या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पावसाळा लांबण्यास अभुतपूर्व पाणीटंचाई तालुक्यात निर्माण होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सुद्धा हातबल झाले आहेत.बोरी नदीवरील आठ कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले असून आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरवर्षी कुरनूर धरण १०० टक्के भरते. यातून दोन पाण्याचे आवर्तने दिले जातात.परंतु यावर्षी बाष्पीभवन, शेतकऱ्यांकडून पाण्याचा वाढलेला उपसा, पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून झालेला उपसा यामुळे धरण एप्रिलच्या पूर्वार्धातच तळ गाठले आहे.सध्या धरणातून पाणी सोडावे अशी स्थितीच नाही. कारण २० टक्के जो पाणीसाठा आहे तो पूर्णपणे मृतसाठा आहे आणि तो जलसंपदा विभागाच्या नियमानुसार शिल्लक ठेवावा लागतो. त्याच्यावरचा राहिलेला ८ टक्के पाणीसाठा जो आहे तो जरी सोडायचा विचार केला तरी तो आता एखाद्या दुसऱ्या बंधाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाही. कुरनूर धरणाच्या खाली एकूण आठ कोल्हापुरी बंधारे  आहेत. ते सर्व बंधारे सध्याच्या घडीला कोरडे आहेत.या बंधाऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी जरी शेतकऱ्यांनी केलेली असली तरी कुरनूर धरणातून पाणी सोडणे किंवा ते शेवटपर्यंत जाणे सध्या तरी शक्य होणार नाही,असे प्रशासनाचे म्हणणे आहे.यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा काय निर्णय अवघड झाले आहे. त्याशिवाय विशेष गोष्ट म्हणजे सांगवी बुद्रुक जलाशय जे आहे ते संस्थान कालीन आहे.या जलाशयामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात गाळ होता.तो गाळ यावर्षी काढण्यात आला आहे. त्यामुळे तेथील जलसाठा हा दुपटीने वाढला आहे.

आता तो जलाशय सुद्धा पूर्ण क्षमतेने भरतो. या जलाशयात साधारण ५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठतो.आज घडीला कुरनूर धरणातून राहिलेले आठ टक्के पाणी जर  सोडायचा निर्णय झाला किंवा सोडले गेले ते एकूण पाणीच ८० ते ९० दशलक्ष घनफूट आहे.त्यामुळे हे पाणी खाली मोट्याळ आणि सांगवी बंधाऱ्यापर्यंतच जाऊ शकते, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यात बोरी नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.पूर्वी कुरनूर धरणावर इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मोटारी किंवा पाणीपुरवठा योजना नव्हत्या.आता समर्थ नगर,वळसंग या योजना सुद्धा कार्यन्वित झाल्या आहेत. पुन्हा भविष्यात दुधनी, मैंदर्गी यासारख्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा हा वर्षभर अशाच पद्धतीने कमी होत राहणार आहे. एकूणच काय तर कुरनूर धरणाची अवस्था सुद्धा आता उजनी धरणा सारखी होणार आहे.पाणी कमी वाटेकरी जास्त अशी स्थिती भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी तर एप्रिललाच धरणाने तळ गाठल्याने अक्कलकोट तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

 

पाण्याचा वापर काटकसरीने करा

खरं तर कुरनूर धरणातून पाणी सोडण्यासारखी सध्याची स्थिती नाही. अजून उन्हाळा संपायला दीड महिना बाकी आहेत. जिथे पर्यंत जाईल तिथपर्यंत आम्ही पाणी सोडणार आहोत. आमचीही हतबलता आहे. यावर्षी सगळीकडेच पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसर
करणे करावा.

प्रकाश बाबा, उप विभागीय अधिकरी, पाटबंधारे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group