अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली नूतन खासदारांची भेट
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.या पार्श्वभूमीवर शेतकरी
संघर्ष समितीचा न्यायालयीन लढा सुरू असताना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आणि रक्कम मिळण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करावा अशी विनंती केली. यानंतर शिंदे यांनी तात्काळ या विषयांमध्ये आपण लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार शिंदे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या व्यथा आहेत. या संदर्भातील व्यथा ऐकून घेताच खासदार शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ च्या रस्त्याबाबत कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके यांना तात्काळ मोबाईलवर संपर्क केला आणि यासंदर्भात तात्काळ बैठक लावण्याची सूचना केली.त्यानुसार उद्या दि.२० जून रोजी (गुरूवारी) माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व म्हेत्रे हे करणार आहेत.
या बैठकीला बाधित शेतकरी आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अडेलतटू धोरणामुळे बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळण्यास अडचणी येत आहेत. न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही नूतन खासदारांची भेट घेतली, असे संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिवगुंडे यांनी सांगितले. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या नूतन खासदार पदी शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय भटक्या जाती जमातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश माने,बाळासाहेब लोंढे पाटील, चंद्रकांत शिंदे,दयानंद लोहार,कल्लप्पा तडवळकर,दयानंद कल्याणशेट्टी,सुधीर माळशेट्टी, सिद्धाराम कुंभार, सिद्धारूढ जोजन, गोकुळ शिंदे,निलेश जाधव, मुकुंद पत्की, रियाज शेख यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक
अक्कलकोट नळदुर्ग रस्त्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा लढा न्यायिक आहे. न्यायालयात देखील त्यांचा मोठा संघर्ष सुरू आहे. पण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून देखील या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत आहोत. उद्या या संदर्भात बैठक होईल.नूतन खासदार प्रणिती शिंदे या देखील याबाबतीत न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री