---Advertisement---

हवामान अपडेट : पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !

By team
On: July 23, 2025 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा इशारा सुरु असतांना आता भारतीय हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 ते 48 तासांत या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • कोकण – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
  • विदर्भ – नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • मराठवाडा – परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मान्सूनने जोर पकडल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टी, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, बीड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांना विशेष सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे.

कोकण विभागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, किनारी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात जोरदार वाऱ्यांसोबत पावसाची शक्यता असल्याने, स्थानिक प्रशासन सतर्क आहे.

विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांचे पाणीपातळी धोक्याच्या स्तरावर असून, काही भागात नदी-नाल्यांनी पूर ओसंडून वाहायला सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून, स्थानिक प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे.

मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कृषी क्षेत्रासाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी, सततच्या पावसामुळे पिकांच्या सडण्याचा धोका वाढतोय, असे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. काही भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याबाबत निर्णय स्थानिक प्रशासन घेईल, अशी माहिती आहे. आपत्कालीन सेवा, मदत केंद्रे, आणि रेस्क्यू पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या किंवा सखल भागात राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संभाव्य पूर, दरडी कोसळण्याच्या घटनांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, एनडीआरएफच्या टीम्सना काही ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!