मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल लावला असून आता राष्ट्रवादी कोणाची याबाबात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे 31 जानेवारीला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाई संदर्भातील कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली. आता येत्या 18 जानेवारीला किंवा त्यापूर्वी सर्व संबंधित पक्ष साक्षीदारांची यादी आणि शपथपत्रांची देवाणघेवाण करतील असे मानले जात आहे. 20 जानेवारीला साक्षीदारांची उलटतपासणी, तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. तर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर 31 जानेवारीला अध्यक्षांना निर्णय देणे अनिवार्य असणार आहे.
याबाबत बोलतांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकेरे म्हणाले की, राष्ट्रवादीची परिस्थिती शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. या प्रकरणात, प्रतिस्पर्धी गटांनी जारी केलेला व्हीप कायदेशीरदृष्ट्या वैध होता की नाही, असा प्रश्न व्हिपच्या वैधतेबाबत आहे. आम्ही एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर आमच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली.