पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाचा वाद मोठा होत असतांना दिसत असतांना नुकतेच राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मात्र, आज शरद पवार यांनी त्या भेटीमागील उद्देश देखील सांगितला.
आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधक का सहभागी झाला नाही. विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, रणनीती कुठे चुकली व बारामती लोकसभेतील लोक सुप्रिया सुळेंच्या पाठिशी कसे उभे राहिले यावर पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचे हित हवं असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये का चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचं उपोषण सुरू असताना काही मंत्र्याचं शिष्टमंडळ देखील गेले होते. त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन पुढील बैठक घेतली जावी, अशी आमची मागणी आहे.
अजित पवार यांनी बारामतीत विकास केला तरीही लोकसभेत सुप्रिया सुळेंना का मतं पडली? या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजे. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. परंतु यावेळी मी थोडा मतदारसंघात फिरलो. परंतु मी मतदारसंघातील 50 टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रिया सुळेंनाच मतदान करतील, तेथील लोकांची मानसिकता मला माहिती आहे. त्यांना माझ्याविषयी देखील माहिती आहे. अजित पवारांनी घरवापसी केली, तर त्यांना पक्षात घेणार का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, घरात सर्वांनाच जागा आहे, पण पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात अनेक जण मजबुतीने उभे राहिले. त्यांना विचारणार व निर्णय घेणार म्हणत पवारांनी हा विषय संपवला.