नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असून देखील महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्वरीत तोडगा का काढला जात नाही, असा सवाल सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला. तर मुळात राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार तणाव निर्माण करत असल्याचा देखील त्यांनी केला.
खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. त्यातून मागासवर्गीयातील लोकांना पुढे येण्यास मोठी मदत झालेली आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असतानाही देखील मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्वरीत कोणताही तोडगा का काढला जात नाही. राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. तर धनगर समाज हा एसटी प्रवर्गात येण्यासाठी मागणी करत आहे. परंतु, महाराष्ट्रातील सरकार हा मुद्दा झुलवत ठेवत आहे. केंद्रात सरकार असल्यामुळे यावर तरी त्वरीत निर्णय होईल, अशी अपेक्षा माझी आहे, यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.
पुढे बोलताना प्रणित शिंदे यांनी राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय आरक्षणाची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देत खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. तसेच महिला आरक्षणाची देखील अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.