मुंबई : वृत्तसंस्था
२०१४ असो की २०१९ भाजपसोबत कधीही जायचे नाही, हीच माझी भूमिका होती आणि यापुढेही राहील. २०१४ साली भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले, तरी प्रत्यक्षात कधीही पाठिंबा दिला नव्हता. बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय राजकीय रणनीतीचा भाग होता. भाजप आणि शिवसेनेत आम्हाला अंतर पाडायचे होते. हे अंतर पाडायला आम्हाला २०१९ मध्ये यश आले. जे सहकारी सोडून गेले आहेत, त्यांना परत यायचे असेल तर त्यांनी राष्ट्रवादी-इंडिया आघाडीत यावे, फक्त भाजपची साथसंगत नको, अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मांडली.
शरद पवार यांनी सोमवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपली भूमिका विस्ताराने मांडली. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २०१४ व २०१७ साली भाजपसोबत जायचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीसाठीही त्यांचा पाठिंबा होता, या दाव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘भाजपसोबत कधीही जायचे नाही, ही माझी भूमिका आधीही होती आणि आताही कायम आहे.’ २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले; पण तो दिला नाही. हा रणनीतीचा भाग होता. मात्र, २०१७ साली शिवसेनेला भाजपपासून दूर करून उद्धव ठाकरेंसोबत जायचा, आमचा विचार होता आणि तो प्लॅन २०१९ मध्ये यशस्वी ठरला.
भाजपसोबत जायचा, माझा प्लॅन कधीही नव्हता, तर माझ्या काही सहकाऱ्यांना मात्र सत्तेसोबत जायचे होते; पण मी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नव्हतो. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझे काही वैयक्तिक निर्णय किंवा अधिकार आहेत की नाही? असा सवाल करतानाच जेव्हा प्रत्यक्षात निर्णय घ्यायची वेळ आली, तेव्हा मी भाजपसोबत न जाण्याचाच निर्णय घेतला, असे पवारांनी सांगितले.
२०१९ च्या पहाटेच्या शपथविधीला आणि भाजपसोबत जाण्यासाठी माझी मान्यता होती, तर तीनच दिवसांत अजित पवारांनी राजीनामा का दिला? मला अजित पवारांची ती कृती आवडलेली नव्हती. लोकशाहीमध्ये सर्वांना सतत सत्ता मिळत नसते, अनेकदा विरोधातही बसावे लागते. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी होती. भाजपसोबत जायचे नाही, ही आपली भूमिका या आधीही होती आणि यापुढेही राहील. जर इतर कुणा सहकाऱ्यांना आताही परत यायचे असेल, तर त्यांनी खुशाल यावे, फक्त भाजपची साथसंगत नको. कारण, या देशाची सत्ता पुन्हा भाजपकडे गेल्यास ती देशहिताची ठरणार नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत, असे ते म्हणाले.