ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘पक्षविरोधी पाठिंबा सहन करणार नाही’; दानवेंचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेत ९ तर पंचायत समितीत ११ सदस्य निवडून आल्याने सत्तास्थापनेत उद्धवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, भाजप व शिंदे गटाला पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

मातृभूमी प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात विजयी सदस्यांची बैठक पार पडली. बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले की, सिल्लोड वगळता सर्व तालुक्यांत उद्धवसेनेला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडीत शिवसेनेचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात कोणी वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना दानवे म्हणाले की, कर्जमाफी झालीच पाहिजे. राज्य सरकारकडे आर्थिक क्षमता आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढा विलंब का होतोय, हेही विचारण्यासारखे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनातील कथित लाचखोरीवरही त्यांनी टीका केली. मंत्रालयात अधिकारी लाच घेताना पकडले गेल्याचा उल्लेख करत गावापासून मंत्रालयापर्यंत लाचखोरीची साखळी असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांवर टीका करत दानवे म्हणाले की, ते जिल्हा परिषद सदस्यांना फोन करून आपल्या पुतण्याला अध्यक्षपदासाठी पाठिंबा मागत आहेत. शासकीय पदावर राहून राजकारण करू नये; इच्छुक असतील तर नोकरी सोडून भाजपच्या सक्रिय राजकारणात यावे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धवसेनेला सोबत घेतल्यास भाजप व शिवसेनादेखील सत्तेत बसू शकतात. अशा स्थितीत मोठ्या बार्गेनिंगची गरज भासणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काही पदाधिकारी उद्धवसेनेशी संपर्क साधत असल्याचीही चर्चा आहे. सत्तेत सहभागी झाल्यास निधी मिळवून पक्ष संघटन बळकट करता येईल, अशी भूमिकाही काही सदस्यांनी मांडल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेची भूमिका आता निर्णायक ठरणार असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!