ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित-विराट आताच होणार निवृत्त? बीसीसीआयचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. ते दोघेही अजून एकदिवसीय सामने खेळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या दोन्ही स्टार खेळाडूंच्या भवितव्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. ऑक्टोबरमध्ये होणारा ऑस्ट्रेलिया दौरा दोघांचा निरोप दौरा असेल, अशा अफवा पसरल्या होत्या.

दरम्यान, रोहित आणि कोहली या दोघांनीही पुनरागमनासाठी सराव सुरू केला आहे, ज्यामुळे या चर्चांना आपोआपच विराम मिळाला आहे. बीसीसीआय देखील या प्रकरणी शांत असून, या स्टार फलंदाजांच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याची कोणतीही घाई करत नाहीये. एका टॉक शोमध्ये बोलताना, शुक्ला यांना सूत्रसंचालकाने प्रश्न विचारला की, सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली तेव्हा जसा निरोपाचा सामना मिळाला, तसा कोहली आणि रोहितला मिळेल का?

यावर शुक्ला यांनी आश्चर्य व्यक्त करत सवाल केला की, “जेव्हा ते दोघेही अजून एकदिवसीय सामने खेळत आहेत, तर लोक त्यांच्याबद्दल इतकी चिंता का करत आहेत?” शुक्ला म्हणाले, “ते निवृत्त कधी झाले? रोहित शर्मा, विराट कोहली दोघेही अजून एकदिवसीय सामने खेळणार आहेत. मग जर ते अजूनही खेळत असतील, तर आता निरोपाबद्दल बोलण्याची गरज काय? तुम्ही लोक आत्तापासूनच काळजी का करत आहात?” शुक्ला यांनी पुढे सांगितले की, “आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे, बीसीसीआय कधीही कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्यास सांगत नाही. खेळाडूला स्वतःच आपला निर्णय घ्यावा लागतो.”

कोहली खूप तंदुरुस्त, रोहितचा खेळही उत्तम’

शुक्ला म्हणाले, कोहली अजूनही सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे आणि रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या स्टार जोडीच्या बाबतीत चाहत्यांनी सध्या निरोपाचा विचार करू नये. जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा आम्ही मार्ग काढू. तुम्ही लोक आतापासूनच निरोपाच्या गोष्टी करत आहात,” असे शुक्ला म्हणाले. दरम्यान, १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून कोहली आणि रोहित पुन्हा एकदा मैदानात परततील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!