ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांनी राजमाता जिजाबाईच्या कार्याचा आदर्श घ्यावा ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. स्वराज्याची स्थापना करण्यास प्रेरणा दिली. महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या मुला मुलींना परिस्थितीनुसार घडविले पाहिजे. तरच उद्याच्या जगात ते सक्षमपणे वाटचाल करतील असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, राजमाता जिजाबाई यांच्याकडे अतुलनीय धाडस होते, बुद्धीचे वरदान त्यांना लाभले होते, आप्तस्वकीय शत्रु विरुद्ध लढत असताना स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूवर देखील मात केली पाहिजे अशी शिकवण त्यांनी छत्रपतींना दिली.

आता देशाची परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तान व चीन हे शत्रु राष्ट्र आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. त्यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत राजमाता जिजाबाईंचे विचारच प्रेरणा देणार आहेत.

प्रारंभी मान्यवरांनी राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले, आभार प्रा मनीषा शिंदे यांनी मानले कार्यक्रमास प्रा शितल गायकवाड, शिल्पा धूमशेट्टी, हर्षदा गायकवाड, भीम सोनकांबळे, जनाबाई चौधरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!