मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आता शिंदेंच्या आमदारांनी थेट संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शरद पवार यांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. मात्र, तुमच्या तर थोबाडीत मारायला हवी, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावरून संजय राऊत यांनी केलेला टीकेला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. यावरुन आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
या विषयी संतोष बांगर म्हणाले की, कायम गद्दारी गद्दारी असे किती दिवस म्हणत राहणार आहात. आता लोकांनीच कोण गद्दार आहे आणि कोण नाही? दाखवले आहे. गद्दार असतो तर आमचे साठ आमदार निवडून आले असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरी गद्दारी तुम्हीच केली असल्याचा आरोप देखील संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
खरी गद्दारी कोणी केली, हे देखील शरद पवार यांना हे उशिरा समजले आहे. त्यांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. तुमच्या तर थोबाडीत मारायला हवी, अशी परिस्थिती असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे नाव गाजवले. तर दुसरे संयमी आणि धुरंधर राजकारणी म्हणून शरद पवार यांचा नंबर येतो, असा दावा देखील आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. या माध्यमातून बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.