पुणे : राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले. सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदनही केलं.
राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि नागपूर मध्ये महाविकास आघाडीनं निर्विवाद बाजी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. महाविकास आघाडीने सहापैकी जवळपास चार जागांवर विजय निश्चित केला आहे.भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागल आहे.






