जयहिंद शुगरकडुन मागील हंगामातील २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा
प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांची माहिती
अक्कलकोट : प्रतिनिधी
आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली.
मागील वर्षी जय हिंद शुगरने ७ लाख ९५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते.दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील आठवड्यातच प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे ऊसबिले जमा करण्यात आल्याची माहिती माने देशमुख यांनी यावेळी दिली.पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की आगामी गाळप हंगामासाठी कारखाना प्रशासनाकडून संपूर्ण तयारी जोमाने सुरू आहे.मागील वर्षाची ऊसबिले अदा करण्यास विलंब झाला याबद्दल शेतकऱ्यांची दिलगिरीदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.आगामी गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वासाने जयहिंद परिवारास ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.यावेळी व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख,शेतकी अधिकारी सी.बी.जेऊरे आदी उपस्थित होते.
साखर कारखानदारी अडचणीत; शेतकऱ्यांनी आवाज उठवावा..!
दरम्यान पत्रकारांशी बोलताना बब्रुवान माने देशमुख यांनी साखर कारखानदारीचा व्यवसाय हा अडचणीत आल्याचे स्पष्ट केले. साखरेचे किमानभूत दर सरकारने जर वाढवले तर शेतकऱ्यांना ऊसासाठीदेखील चांगला भाव प्रत्येक कारखानदार देऊ शकतो. परंतु दर वाढवण्यासंदर्भात शेतकरी सरकारवर दबाव टाकू शकतात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.काही वर्षांपुर्वी भारत देशात ७५ टक्के घरांत साखरेचा वापर होत असे.आज ८५ टक्के साखर औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जात आहे.पण तरीही साखरेच्या दरात हवी तितकी वाढ होऊ शकली नाही,हे दुर्दैव!मात्र साखरेचे दर वाढले तर शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास कोणतीही अडचण येणार नाही.