छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी सरकारविरोधात लढा देत असतांना आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून भीती दाखवली जात आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या शनिवारी (२ मार्च) झालेल्या बैठकीत करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेला किंवा कार्यक्रमांत जाऊ नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून ५ हजार उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे साडेबारा कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून संकलित करण्यात येणार आहे. एका गावातून दोन उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शनिवारी जळगाव रोडवरील मराठा मंदिर येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासह सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, परंतु राज्य सरकारने स्वंतत्र १० टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाला हे आरक्षण मान्य नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बैठकीत टीका करण्यात आली आहे. या वेळी सहा ठराव मंजूर करण्यात आले. त्याला उपस्थितांनी हात वर करून पाठिंबा दिला. या वेळी चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, विजय काकडे यांची उपस्थिती होती.
मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील असून त्यांची एसआयटी चौकशी रद्द करा सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आंतरवाली सराटीसह आजपर्यंत मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्या मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण ५० टक्के आरक्षणाच्या आतले असावे मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात आली तर गावागावातून जेल भरो आंदोलन करण्यात येईल. सर्वपक्षीय मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध नोंदवावा.