ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जगतापांची बदली होईपर्यंत तलाठ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन…!

सोलापूर : ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका तलाठी संघटनेने दिला आहे.

तलाठी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षांना वरिष्ठांनी अर्वाच्च,अशोभनीय भाषा वापरून अपमानित केल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील सर्व तलाठ्यांनी राज्य संघटनेच्या आदेशान्वये दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ई- महाभूमी प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे लेखी निवेदन तलाठी संघटनेने महसूल प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस आंदोलन सुरू आहे, मात्र याची शासन स्तरावर अद्याप दखल घेतली गेली नाही.

या संदर्भात दक्षिण सोलापूर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब कोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी, पटवारी व मंडलाधिकारी हे महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी, महसुलात वाढ करण्यासाठी, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांनी सध्या राज्यातील सध्याची नैसर्गिक आपत्ती, ई- पीक पाहणी आणि मोफत सातबारा खातेदारांना वितरण याबाबत 5 ऑक्‍टोबर रोजी मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मेसेज पाठविला होता. हा मेसेज महाभूमी प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांना प्राप्त झाला.

संदेश प्राप्त झाल्यानंतर मार्गदर्शन तर सोडाच, पण मूर्खासारखे मेसेज पाठवू नका, असा उलट संदेश देऊन सर्वांनाच अपमानित केले आहे. तसेच सर्व तलाठी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व तहसीलदार यांचा अपमान केला आहे. त्यामुळे या सर्वांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राज्य समन्वयक जगताप यांची तात्काळ बदली करावी, त्याशिवाय काम सुरू न करण्याचा निर्धार तलाठी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. तलाठ्यांच्या या आंदोलनामुळे उत्पन्नाचे दाखले,सातबाराचे उतारे, बॅंक कर्जाचे बोजा चढविणे, ई- पीक पाहणी ही कामे रखडली असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. मात्र,सध्या शेतकरी अडचणीत असल्याने पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे व निवडणुकीचे काम आम्ही करू, असे निवेदनात नमूद केले आहे.

सातबारा उताऱ्यासाठी लागणारा डिजिटल सिग्नेचर यंत्रणेचा डोंगलही तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे जमा केले आहेत. तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

तलाठी संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी अडचणीवर उपाययोजनेसाठी मार्गदर्शन मागणे हे गैर नाही,मात्र समजावून न घेता अपमानित करणे योग्य नाही, सर्वांच्या भावना दुखावल्याने जगताप यांची बदली झालीच पाहिजे अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब कोकरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!