तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२९ : कुरनूर धरणालगत बऱ्हाणपुर हद्दीमध्ये सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पाच्या बेकायदेशीर कृत्याची दखल मत्स्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने घेतली.याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून तलाव उध्वस्त करणार असल्याची अशी माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आर.आर महाडीक यांनी दिली.गेल्या दोन वर्षांपासून राजरोसपणे या ठिकाणी
मांगुर जातीच्या माशाचे पालन करून उत्पादन घेतले जात आहे. तलावातील घाण पाणी हे कुरनूर धरणात सोडले जात आहे आणि तेच पाणी अक्कलकोट शहरासह ५१ गावातील नागरिकांना दिले जात आहे. ही बाब अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे.वास्तविक पाहता देशात मांगूर माशाच्या उत्पादनाला बंदी आहे.अशा स्थितीत सर्व नियम धाब्यावर बसवून याचे पालन केले जात होते.याला नेमके अभय कोणाचे यावरती आज दिवसभर चर्चा सुरू होती.एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या नावाखाली धरण सुधारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत तर दुसरीकडे धरणाच्या लगत असा गंभीर प्रकार सुरू असल्याने प्रशासन नेमके काय करतेय,असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच बुधवारी दुपारी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आर.आर महाडिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक
महेश भावीकट्टी,पंचायत समितीचे माजी
विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मत्स्यपालनाला असलेल्या रक्षकाकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.
हा प्रकल्प तर बेकायदेशीर आहेच.याची कुठलीही परवानगी न घेता हे सर्व कामकाज सुरू आहे.त्यामुळे कायदेशीररित्या सर्व प्रकारची कारवाई त्यांच्यावर करून हे सर्व शेततळे
उध्वस्त करून जमीन पूर्ववत करण्यात येईल,असे महाडिक यांनी सांगितले.याबाबत उपविभागीय पाटबंधारे अधिकारी प्रकाश बाबा यांना देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी सकाळीच याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.तहसीलदार बाळासाहेब शिरसट आणि कुलकर्णी यांच्यात चर्चा होऊन कडक कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे.ही बाब गंभीर असून या सर्व प्रकारावर कारवाई करून तलाव कायमस्वरूपी उध्वस्त करावेत,अशी मागणी बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.
गुन्हा दाखल
करण्याचे काम सुरू
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू होती.लवकरच संयुक्तिक कारवाई होईल,
असे सांगण्यात आले.
तातडीने जलसंपदा
विभागाला पत्र
ही बाब निश्चितच गंभीर आहे.याबाबत आम्ही तातडीने जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. कारवाई करण्याचा अधिकार जलसंपदा विभाग आणि मत्स्य विभागाला आहे.यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सचिन पाटील,मुख्याधिकारी