कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाची कारवाई, शेततळे उध्वस्त करण्याचे काम सुरु
अक्कलकोट, दि.३१ : कुरनूर धरणालगत
सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्पावर अखेर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शेततळे उध्वस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.शुक्रवारी, सकाळी या मोहिमेला पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट आणि पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
यात पाणी असेलेले आणि नसलेले १९ तलाव असून ते खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेले आहेत.त्यामुळे कारवाई पूर्ण होण्यास थोडा वेळ लागणार आहे. त्यातील बहुतांश तलावात १५ ते २० फूट पाणी असून हे पाणी पहिल्यांदा सगळीकडे पसरविण्यात येणार आहे.त्यानंतर मासे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे,ही कारवाई साधारण चार ते पाच दिवस चालेल,असे मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त राजकुमार महाडिक यांनी सांगितले. लाभ क्षेत्राचे अधीक्षक अभियंता धीरज काळे यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या तलावाची नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून आम्ही या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून आहोत,असे बोरी पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित मनलोर यांनी सांगितले.आज दिवसभर हे काम सुरू होते.या मोहिमेत तहसीलदार बाळासाहेब शिरसट, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,पाटबंधारे विभागाचे रोहित मनलोर, पोलीस उपनिरीक्षक महेश भावीकट्टी, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे ,गोपनीय शाखेचे धनराज शिंदे यांच्यासह पालिका व मत्स्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेला येथील सुरवसे वस्ती येथील स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली.तलाव नष्ट करण्याची प्रक्रिया थोडी किचकट आहे.
एका तलावातून पाणी सोडून मासे नष्ट करायचे झाल्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे.त्यामुळे सर्व तलावाचे बांध फोडून पाणी एकत्रित करून मासे नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे आणि एका स्वतंत्र खड्ड्यात पुरले जातील,असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्यात आला असून या मांगुर प्रकल्पावर प्रशासनाची बारीक नजर असल्याचे तहसीलदार शिरसट यांनी सांगितले.
मासे घेऊन जाण्याची
विनंती फेटाळली
तलावाचे संरक्षण करणाऱ्या काही रक्षकांनी मासे आम्ही घेऊन जातो, अशा प्रकारची विनंती प्रशासनाला केली परंतु ही विनंती प्रशासनाने फेटाळून लावत असा प्रकार केला तर पुन्हा गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी दिला आहे.
दोषींची गय केली
जाणार नाही
मांगुर प्रकल्पाचे दूषित पाणी कुरनूर धरणात सोडणे ही बाब गंभीर च आहे म्हणून प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला.यात कुणाचीही गय केली जाणार नाही.
बाळासाहेब शिरसट,तहसीलदार