ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोमवारपर्यंत वीजबिल कमी करा, अन्यथा…मनसेचा इशारा

वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्यांना झटका देणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.  सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली.

वीज बिलप्रश्नी दिलासा देण्याचं आश्वासन ठाकरे सरकारनं दिलं होतं. मात्र उर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला. हा राज्यातल्या साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात आहे. राज्य सरकारमध्ये मतभेद असतील. त्यांच्यात पक्षीय राजकारण असेल. मात्र त्याचा फटका जनतेनं का सहन करायचा, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला. राज्यातल्या जनतेनं वीज बिलं भरू नयेत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आल्यास मनसैनिक त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील, अशी भूमिका नांदगावकर यांनी मांडली.

आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!