आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे – दानवे
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील महालगाव येथे आदित्य ठाकरेंच्या सभेत जोरदार राडा पाहायला मिळाला. संतप्त लोकांनी आदित्य यांच्या ताफ्यावर दगडफेक केली तसेच प्लास्टिकचे पाईपही फेकले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात सभा आयोजित करण्यात आली होती. रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. मिरवणूक आणि सभा एकाच वेळी एकाच ठिकाणी आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सभेसाठी तयार केलेल्या व्यासपीठाच्या मागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला सांगितल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सरकारचे देखील आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. “आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव वैजापूर येथील सभेदरम्यान झाला. सदर गोंधळ घालणारे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे ” असे अंबादास दानवे म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, मुद्दाम दलित समाज आणि हिंदू यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न या जमावामधील काहीजण करत होते. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना, अशापद्धतीने काही लोक मुद्दाम या जमावात घुसून वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही निषेध करतो.” असेही ते म्हणाले.