ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुणे येथे १३ फेब्रुवारीला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा, सोलापूर जिल्ह्यातून हजारो कर्मचारी सहभागी होणार

अक्कलकोट ता.८ : राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळचे जिल्हा अध्यक्ष रविकांत सुर्वे, जिल्हा सचिव मुस्ताक शेतसनदी व प्रदेश उपाध्यक्ष श्रीशैल तळवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळचे राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर व राज्य अध्यक्ष अनिल माने यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी शनिवार वाड्यापासून सेंट्रल बिल्डिंगपर्यंत पायी मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. पद भरती,आश्र्वासित प्रगती योजना लागू करावी, अनुकंपा भरती सुरू व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेत्तर शिक्षणसेवक मानधनात वाढ करावी, शैक्षणिक पात्रता वाढविल्यास विनाअट संवर्ग बदलून पवित्र प्रणालीतून वगळावे,२४ वर्षानंतर दुसरा लाभ मंजूर करुन फरक द्यावा, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास वेतन संरक्षण मिळावे,उच्च माध्यमिकसाठी स्वतंत्र लिपीक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळावा,सरेंडर रजेचा लाभ पूर्वीप्रमाणे मिळावा, विनाअनुदान तुकडीतील विद्यार्थी संख्या शिक्षकेत्तर पद मंजुरीसाठी ग्राह्य धरावी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी होणारा प्रत्यक्ष खर्च धुलाई भत्ता वेतनातून मिळावा, न्यायालयीन निर्णयानुसार राज्यातील सर्व पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, राज्यातील अनुदानित विना,अनुदानित वैद्यकिय,अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात अशा असंख्य मागण्या, न्याय हक्कासाठी राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी सरकारला जागे करण्याच्या उद्देशाने मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत.

मोर्चासाठी सोलापूर जिल्हा शिक्षकेत्तर संघाची जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्यातील बहुसंख्य बांधवांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलेले आहे. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रविकांत सुर्वे,सचिव मुश्ताक शेतसंदी,शिवाजी थिटे,प्रकाश आळंगे,जिल्हा कोषाध्यक्ष महेश रामशेट्टी,सुरेश कोळी,विजयकुमार माने,हणमंत मोरे,सतीश विभुते,सविता कांबळे,रत्नाकर लोंढे,तुकाराम शेजाळे, चेतन जाधव,चंद्रकांत हरलय्या,धर्मराज अरबाले,विकास तळवार, व्यंकटेश रच्चा,रमेश इंडे,धनाजी भोसले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!