मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर शिवसेना आणि धनुष्य बाण पहिल्यांदा जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हणाले.
शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.
मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या वादावर भाष्य केले. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही असेही त्यांनी म्हटले. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपेल की नाही माहित नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटात शिवसेना बंडखोरीच्या वादावर भाष्य केले. आज शिवतीर्थावर मोठी गर्दी आहे. कोणीतरी आपल्याला संपलेला पक्ष म्हटले होते. ज्यांनी संपलेला पक्ष म्हटले त्यांची आजची अवस्था काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पक्षातून बाहेर पडलो त्यावेळी माझा वाद हा विठ्ठलाशी नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे म्हटले होतो. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, त्यात मला वाटेकरी व्हायचं नाही असेही म्हणालो होतो याची आठवण राज यांनी करून दिली.
यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये लाव रे तो व्हिडीओ अस म्हणताच प्रेक्षकांचा एकच जल्लोष केला. त्यांनी व्हिडीओ दाखवून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची प्रशंसा केल. ते म्हणाले कि, माझ्या देशाला यांच्या सारखा मुसलमान हवा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगायचं आहे की, गेल्या गुढीपाडव्याला आम्ही जे सांगितलं होतं की मशिदीवरील भोंगे बंद करा. गेल्या सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर 17 हजार गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे पहिल्यांदा मागे घ्या.
एकतर तुम्ही सांगा लाउडस्पीकर बंद करा, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाउडस्पीकर बंद करतो. दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारला घ्यावाच लागेल. गेल्या काही दिवसात मशिदीवरील भोंगे पुन्हा मोठ्या वाजू लागले आहेत. मी विषय सोडलेला नाही. मी विषय सोडणार नाही. मी पुन्हा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. मी मुद्दामून तुमच्या साक्षीने हा मुद्दा येथे काढला.त्यासाठी मी परत जाऊन भेटणार.”, असं आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.