ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन् दिव्यांगांनी दिले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना अभियान कार्यक्रमाचे निमंत्रण

 

सोलापूर (प्रतिनिधी) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, या अभियानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देऊन प्रशासनाला असलेल्या सामाजिक जाणिवेची वीण आणखी घट्ट केली.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी, या अभियानाचा सोलापूर जिल्हास्तरीय अभियान मेळावा बुधवारी (२०) सोलापुरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात होणार असून या कार्यक्रमासाठी या अभियानाचे प्रमुख ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्यातील दिव्यांगांना न्याय मिळावा, या भूमिकेतून ना. कडू यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून प्रत्येक जिल्ह्यात या अभियानातून दिव्यांगांना त्यांच्या मागणीनुसार ३२ हून अधिक शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. सोलापुरात होणा-या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून अभियानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, या अभियानाचे सचिव जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्त शीतल तेली – उगले या गेली एक महिन्यापासून या अभियानाच्या यशस्वितेसाठी कटीबद्द राहून नियोजन करीत आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत खमितकर म्हणाले, एक महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगरपालिका, नगर परिषदा यांच्या सहभागातून या अभियानाचे नियोजन सुरु असून शहर व जिल्ह्यातून सुमारे दहा हजार दिव्यांग या अभियान कार्यक्रमासाठी येणार असल्याचे गृहित धरुन त्यादृष्टीने सर्व तयारी केली आहे. प्रहार संघटनेच्या संजिवनी बारंगुळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या दालनात उपस्थित होते. त्यांनी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दिली. त्यावेळी जिल्हाधिका-यांसह उपस्थित असलेले सारेच भारावून गेले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!