मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करु; असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले आहे; अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
Watch Our Latest Video
आमदार कपिल पाटील यांच्यासोबत अंगणवाडी ताई आणि शिक्षक भारती शिष्टमंडळा सोबत आदिती तटकरे यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीच्या नेत्या मायाताई म्हस्के, सुरेखा घाडगे, आशाताई देशमुख, प्राथमिक शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, संघटक प्रकल्प पाटील आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत आदिती तटकरे यांनी तीन हजार मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी ताईंना वैद्यकीय उपचार देण्याचे मान्य केले. तसेच त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा खर्च शासन करणार असून थकीत बिले तातडीने देण्याचे मान्य केले. अंगणवाडी सेविकांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे आश्वासनही तटकरे यांनी दिले.









