बीड : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांदाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतांना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बीडमधील एका शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिकिलो १ रुपया इतकाच भाव मिळाला आहे.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कांदा बांधावर फेकून दिला असून शेतात अक्षरशः कांद्याचा सडा पडला आहे. वैभव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते नेकनूर गावातील रहिवासी आहे. वैभव यांच्याकडे ७ एकर शेती असून यामध्ये त्यांनी दोन एकरमध्ये कांदा पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांना ७० हजार रुपये खर्च आला. उसनवार यांनी कर्ज घेऊन लावलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल आणि आपली आर्थिक घडी बसेल. असं स्वप्न वैभव शिंदे यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, जेव्हा सोलापूरच्या मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी नेला, तेव्हा त्याला कवडी मोल भाव मिळाला. वैभव यांचा कांद्याला प्रतिकिलो १ रुपया इतकांच भाव मिळाला. यामुळं त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. उलट ५५८ रुपये तेथील आडत दुकानदाराला देण्याची वेळ वैभव शिंदे यांच्यावर आली. कांदा तर गेलाच मात्र एवढी मेहनत घेऊन आडत दुकानदाराला देखील पैसे द्यावे लागले.
यामुळे वैभव शिंदे यांनी उर्वरित कांदा आपल्या शेतात आणि शेताच्या बांधावर फेकून दिला. याविषयी तरुण शेतकरी वैभव शिंदे म्हणाले, की “आम्ही दोन एकरात कांदे लावले होते. त्यासाठी मोठा खर्च आला होता. या कांद्यावर कुटुंबाची गुजरात होईन, असं वाटलं होतं. मात्र त्याचं कांद्याने डोळ्यात पाणी आणलं. आज कांद्याला भाव मिळाला नाही”.