ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इराणमध्ये भीषण स्फोट : १०३ ठार तर १४० पेक्षा अधिक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इराणमध्ये एका सभेत बुधवारी १५ मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये १०३ ठार, तर १४० हून अधिक जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा इराणी प्रशासनाने केला आहे. मात्र, हल्ल्यामागे कोण याबाबत इराणने कोणताही उल्लेख केला नाही.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड एलि कुर्द दलाचा प्रमुख जनरल कासिम सुलेमाणी ३ जानेवारी २०२० रोजी इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला होता. त्याच्या चौथ्या स्मृतीदिनाप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही केरमन भागातील त्याच्या थडग्याजवळ सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सुलेमाणी समर्थक जमले असताना या ठिकाणी दोन साखळी स्फोट घडवण्यात आले. त्यामुळे स्फोटातील बळी व जखमींचा आकडा मोठा आहे. शिवाय जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. हा दहशतवादी हल्लाच असल्याचा दावा इराण सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी न घेतल्याने हल्ल्याच्या कारण समोर आलेले नाही. इराणनेही याबाबत कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही.

मात्र, इस्रायल व हमासदरम्यान युद्धसंघर्षांदरम्यान गाझातील हमास, लेबननमधील हिज्बुल्ला व येमेनमधील हुथी बंडखोरांचा समर्थक असलेल्या इराणमधील या हल्ल्याने आखातातील तणावात भर पडण्याची भीती आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० साली सुलेमाणीच्या अंत्ययात्रेवेळीही चेंगराचेंगरी झाल्याने ५६ लोकांचा बळी गेला होता, तर २०० हून जास्त जण जखमी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!