ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणुकीची प्रचारापासून रोखण्यासाठी माझी अटक ; केजरीवालांचा पलटवार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हाताशी धरून मला अटक करू इच्छित आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी केला. प्रामाणिकपणा ही माझी संपत्ती असून भाजप माझी प्रतिमा मलिन करीत असल्याचा जोरदार पलटवार त्यांनी केला. याचवेळी दिल्ली मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे. सध्या केजरीवालांनी दिलेल्या लिखित उत्तराची समीक्षा केली जात असल्याचे ईडीने सांगितले.

आम आदमी पक्षाचे ५५ वर्षीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ३ जानेवारी रोजी तिसऱ्यांदा ईडीच्या चौकशीला दांडी मारली. त्यानंतर गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, ईडीचा दृष्टिकोन कायदा व समता आणि न्यायाच्या कसोटीला खरा ठरत नाही. ईडीचा अट्टाहास हा जल्लादासारखा आहे. ईडीचे समन्स अवैध असून नेमक्या कोणत्या आरोपांवरून आपल्याला पाचारण केले आहे? याचा खुलासा ईडीने केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आपल्याला रोखण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी भाजप मला अटक करू पाहत आहे. प्रामाणिकपणा ही माझी संपत्ती आहे. तरीही देशात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीचा समन्स अवैध आहे. याबाबत माझ्या वकिलांनी मला सूचित केले, असा पलटवार अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!