मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटास देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर पक्षावर अधिकार कोणाचा, याबाबत निवडणूक आयोगात सहा महिन्यांहून अधिक काळ सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी वकील अभिषेक जेबराज यांच्यामार्फत वैयक्तिक पातळीवर ही याचिका दाखल केली असून या याचिकेत लवकर सुनावणी घेण्याची मागणीही त्यात करण्यात आली आहे.
अजित पवार गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे. या प्रकरणी विरोधकांनी दाखल केलेल्या कोणत्याही याचिकेवरील सुनावणीदरम्यान आपलीही बाजू मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.