अक्कलकोट : मारुती बावडे
महाराष्ट्र शासनाने दिन दलित गोरगरीब वंचित नागरिकांच्या मुलींची काळजी घेण्यासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही महत्वकांक्षी अभिनव योजना सुरू केली.प्रशासकीय स्तरावरून याची माहिती प्रसारित केली गेली असली तरी ग्रामीण भागातून याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही,असे चित्र आहे.परंतु ही योजना मुलींसाठी खूप चांगली आहे त्याबाबत अनेक पालक देखील अनभिज्ञ असून त्यांना माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पालकांनी स्वतःहून या योजनेकडे गांभीर्याने पाण्याची गरज आहे. १ एप्रिल २०२३ पासून साधारण अकराशेच्यावर तालुक्यात मुली जन्माला आलेल्या आहेत.त्यापैकी ७६३ मुली या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
याचा आता पालकांनी लाभ घेण्याची गरज आहे.लेक लाडकी योजना ही मुलीच्या सक्षमीकरणासाठी ही नवीन योजना आहे.पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्या-टप्यामध्ये अनुदान देण्यात येवून लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्तासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्तासाठी अर्ज सादर करतेवेळी माता – पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
मात्र त्यानंतर माता – पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये १ लाख पेक्षा जास्त नसावे.यासाठी लाभार्थीचा जन्माचा दाखला, तहसिलदाराचे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील, पालकाचे आधार कार्ड , बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत,रेशन कार्ड पिवळा अथवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरीता १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधीत शाळेचा दाखला ,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.अधिक माहिती करिता जवळच्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व लाभार्थ्यांना लाभ देऊ
जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. त्या माध्यमातून त्यांच्या पालकांकडे पाठपुरावाही सुरू आहे आत्तापर्यंत अडीचशे जणांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहेत. बाकीच्यांचेही प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेऊन त्यांना लाभ देणार आहोत.
– सुवर्णा जाधव,बालविकास प्रकल्प अधिकारी
लाभ कसा मिळणार आहे ?
मुलीचा जन्म झात्यावर ५ हजार, मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार, मुलगी सहावीत गेल्यावर ७ हजार, मुलगी ११ वीत गेल्यावर ८ हजार ,मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
चांगल्या योजनेचा जनतेला विसर
महाराष्ट्र शासनाने एवढी चांगली योजना मुलींसाठी आणलेली असताना पालकांनी देखील जागृत असणे गरजेचे आहे.त्यांनी देखील स्वतःहून संबंधित विभागाशी संपर्क साधून त्याची कागदपत्रे देऊन त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. एकीकडे योजना नाहीत म्हणून ओरड करायची आणि दुसरीकडे चांगल्या योजना असताना त्याचा लाभ घ्यायचा नाही हे कसली मानसिकता अशी चर्चा या विषयावरून सुरू आहे.