---Advertisement---

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावाची जोरदार चर्चा

By team
On: March 20, 2024 2:33 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. यापूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून अनेकांची नावे आघाडीवर होती. मात्र आता लातूरचे उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आले आहे.

पद्मश्री प्राप्त मिलिद कांबळे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंती दिली आहे. या संदर्भात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा आमदारांसह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पद्मश्री कांबळे यांच्या उमेदवारी संदर्भात प्रदेश भाजपाकडून निरोप पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पद्मश्री मिलिंद कांबळे हे मूळ लातूर जिल्ह्यातील असून २००५ साली त्यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना केली. २०१३ साली त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून अनेक नावांची चाचणी करण्यात आली. मात्र चर्चेत असलेले कोणतेही नाव उमेदवार म्हणून अद्याप घोषित करण्यात आले नाही. आता संभाव्य उमेदवार म्हणून पद्मश्री कांबळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उमेदवार म्हणून या पद्मश्री कांबळे यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार की उमेदवार दुसरा असणार ? हे मात्र भाजपकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!