ध्यास विश्वसार्ह बातमीचा

केजरीवालांची अटक त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे ; अण्णा हजारे

अहमदनगर : वृत्तसंस्था

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या वतीने अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे याविषयी अण्णा हजारे यांनी दुःख व्यक्त केले आहे. माझ्यासोबत काम करणारे, दारू विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल आता दारू धोरण बनवत आहेत, हे ऐकून दुःख झाले. त्यांची अटक त्यांच्या स्वतःच्या कृत्यामुळे झाली आहे. त्यामुळे आता काय होणार, हे न्यायालय पाहिल, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या वतीने दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी अटक होऊ नये यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यानंतर चौकशी करत ईडीने त्यांना ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणावरून देशभरात गदारोळ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करणे हे हुकुमशाहीचे लक्षण असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर एका मुख्यमंत्र्यांना अटक करणे हे घटनाबाह्य असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे.

या संदर्भात अण्णा हजारे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मला अत्यंत दुःख झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा व्यक्ती जो माझ्यासोबत काम करत होता. दारू विषयी आम्ही आवाज उठवला होता. आणि तोच व्यक्ती आज दारू धोरण तयार करत आहे, हे ऐकून मला दुःख झाले, असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मात्र, मी काही करू शकत नाही. सत्तेसमोर काहीही करता येत नाही, असे देखील हजारे यांनी म्हटले आहे. त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे. अटक करण्यात आली आहे. हे त्यांच्या कृतीचे फळ असल्याचे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आपण अशा प्रकारचे कृत्य केले नसते तर अटक होण्याचा काही संबंध नव्हता. त्यामुळे आता जी अटक झाली आहे, त्यावर जे होईल ते कायदेशीर रित्या होईल. काय करायचे ते सरकार करेल, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!