मुंबई : वृत्तसंस्था
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल अद्याप न्यायप्रविष्ट असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निकाल लागला असल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. राणांच्या जात प्रमाणपत्राविषयी खोटी माहिती देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा एकप्रकारे आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने बावनकुळे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीत असे म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने नवनीन राणा यांच्या प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या, अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे.