ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसला पापाची शिक्षा आज मिळतेय ; पंतप्रधान मोदी

जयपूर : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक सभांमधून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागले. काँग्रेसने घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची वाळवी पसरवून देशाला पोकळ करण्याचे काम केले. याच पापाची शिक्षा काँग्रेसला आज मिळत असल्याची टीका मोदींनी केली. कधी काळी देशात ४०० जागा जिंकणारे आज ३०० जागांवरदेखील निवडणूक लढवू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला मारला.

राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाकडे इशारा करत मोदींनी अर्ध्या राजस्थानने काँग्रेसला योग्य शिक्षा दिल्याचा दावा केला. राष्ट्रभक्तीने ओथंबलेल्या राजस्थानातील जनतेला चांगले माहिती आहे की, काँग्रेस कधीही मजबूत भारत बनवू शकत नाही. देशाला अशा प्रकारचे काँग्रेस सरकार पाहिजे नाही. २०१४ पूर्वीची स्थिती लोकांना हवी नसल्याचे मोदी भीनमाल (जालोर) मधील सभेत म्हणाले. कमकुवत काँग्रेस सरकारमध्ये कोणीही धमकावून जात होते. प्रत्येक जण देशाला लुटण्यात व्यस्त होता. पंतप्रधानांना तर कोणीही विचारत नव्हते.

सरकार रिमोट कंट्रोलवर चालत होते, असा आरोप मोदींनी केला. कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला कायदा त्यांच्याच नेत्यांकडून पत्रकार परिषदेत फाडला जात होता. अशा दुर्बल अवस्थेतील पक्ष देशाला मजबूत बनवू शकतो का? अस्थिरतेचे प्रतीक बनलेला काँग्रेस पक्ष देश चालवू शकतो का? असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले. तसेच देशात आज काँग्रेस पक्षाची जी अवस्था झाली आहे, त्यासाठी ते स्वतः गुन्हेगार असल्याची टीका मोदींनी केली. ६० वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने देशातील माता-भगिनींना शौचालय, गॅस, वीज, पाणी आणि बँक खाते यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुर्लक्षित केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची वाळवी पसरवून देशाला पोकळ बनवण्याचे काम केले. याच पापाची शिक्षा देश काँग्रेसला देत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!